औरंगाबाद : घरातील सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने घराला आग लागल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास वाळूज मधील साठेनगर भागात घडली.सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसून घरातील लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
प्रकाश सखाराम शेरे वय-52 (रा.साठेनगर, वाळूज) यांच्या घरात प्रकाश लक्ष्मण पाचरने वय-55 हे किरायाने राहतात.आज सकाळी घरी त्यांची पत्नी मुलगी असे चार जण घरी होते. मुलीने स्वयंपाक घरात सकाळचे जेवण बनविल्यानंतर समोरच्या घरात येताच गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला प्रसंगावधान राखत घरातील चारही सदस्य बाहेर पडले. क्षणातच आगीने घराला विळख्यात घेतले. शेजार्यांनी ही माहिती अग्निशमन दलाला देताच तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले होते.या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मजुरी करून एक एक साहित्य जमविलेल्या पाचरने परिवार या आगीमुळे उघड्यावर आले आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.